युवक - युवतींचे भवितव्य घडविण्यासाठी
कटीबद्ध : मंत्री मंगलप्रभात लोढा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कौशल्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आयटीआय मध्ये आलेले सगळे विद्यार्थी हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्या आपुलकीनेच युवक युवतींचे भवितव्य घडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केले.
देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आज लोढा यांच्या उपस्थितीत एकात्म मानवतावाद याविषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्रेम खडकीकर यांनी ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष गर्दे, सदस्य अर्जून गायकवाड, उपसंचालक प्रदीप दुर्गे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आल्टे, तसेच जग्वार फाऊंडेशनचे प्रसाद कंकाळ, सेंट ग्लोबेन्चे वैष्णव धार्मिक, टीएनएसच्या रुपा बोहरा, टोयोटा किर्लोस्करचे बी. एल. सुधाकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी सोलर रिपेअरिंग, स्किन केअर, ड्रेस मेंकिंग, एआय, रोबोटिक्स, मोबाईल रिपेअरिंग इ. विविध अभ्यासक्रम हवेत असे मंत्री लोढा यांनी सांगितले. यातील निम्मे अभ्यासक्रम लगेचच सुरु करण्यात येतील,असे आश्वासनही लोढा यांनी दिले.